top of page
  • Writer's pictureDr. C. S. Sada

आम्हाला बाळ हवंय!

लोकसत्ता, पुणे वृत्तपत्रात छापलेला लेख (आम्हाला बाळ हवंय!) .

दि. २३ नोव्हेंबर २०१३
लंडनमधील बार्न हॉल क्लिनिक (Bourne Hall Clinic) हे आयव्हीएफ म्हणजे 'इन विट्रो फर्टीलायझेशन' चे जन्मस्थान. आयव्हीएफ म्हणजे कृत्रिम गर्भधारणा. सत्तरच्या दशकात डॉ. पॅट्रिक स्टेप्टो आणि डॉ. रॉबर्ट एडवर्ड्स आयव्हीएफ वर संशोधन करत होते. १९७८ मध्ये पहिल्यांदा टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञाने लुईस ब्राउन या बाळाचा जन्म झाला. वंध्यत्वाचा सामना करत असलेल्या आणि आपल्या बाळाची प्रतीक्षा असलेल्या जोडप्यांसाठी हा शोध त्यांचे जीवन बदलून टाकणारा होता.Sperm is being injected in egg in lab

हल्ली इंटरनेटवर कृत्रिम गर्भधारणेविषयी पुष्कळ माहिती उपलब्ध आहे. मोबाईल आणि कॉम्पुटर वरच्या इंटरनेट च्या सहज उपलब्धतेमुळे ही माहिती केव्हाही मिळवणे सोपे आणि सहज झाले आहे. आयव्हीएफ साठी डॉक्टरांकडे जाणाऱ्या जोडप्यांनी या विषयावर आधीच भरपूर वाचन केलेले आढळते. पण वाचनाअंती जोडप्यानं हा विषय फारसा समजला नसल्याचेच आढळते. सामान्य माणसाने या विषयावर बरेच काही ऐकले असते, पण तरीही नक्की काय? असा प्रश्न अनेकदा अनुत्तरित राहिलेला दिसतो. नव्याने वैद्यकीय क्षेत्रात पाऊल ठेवलेल्या डॉक्टरांनाही या विषयाबद्दलचे गैरसमज दूर करणे शक्य होतेच असे नाही. हल्ली अनेक जण गूगल करूनच माहिती मोफतपणे मिळवण्याची धडपड करतो. परंतु आयव्हीएफ विषयी अशा प्रकारे मिळवलेली माहिती म्हणजे अनोळखी मुलुखात केलेली भटकंती ठरते. इथेच आयव्हीएफ तंत्राचा प्रवेश होतो. आयव्हीएफ प्रक्रियेतील संकल्पना जाणून घेतल्यास प्रत्यक्ष प्रक्रिया करणे सोपे होऊन जाईल.


कृत्रिम गर्भधारणा प्रक्रियेत खालील विविध प्रक्रिया वापरल्या जाऊ शकतात.

१. फॉलिक्युलर मॉनिटरिंग : या प्रक्रियेत स्त्रीच्या शरीरातील स्त्रीबीज ग्रंथीमध्ये (ओव्हरीज) असलेल्या 'फॉलिकल्स' ची म्हणजे स्त्रीबीजांची वाढ कशा प्रकारे होत आहे यावर नियमित तपासण्यांद्वारे लक्ष ठेवले जाते. यात स्त्रीबीजाच्या अपेक्षित वाढीसाठी डॉक्टरांद्वारे काही औषधांचाही वापर करण्यास सुचवले जाऊ शकते.


२. स्पर्म प्रिपरेशन : कृत्रिम गर्भधारणेसाठी पुरुषाकडून मिळवलेल्या शुक्राणूंपैकी गर्भधारणेस योग्य असे शुक्राणू वेगळे काढले जातात. स्पर्म प्रिपरेशनमध्ये कार्यक्षम शुक्राणू अधिक संख्येने एकत्र आणणे अपेक्षित असते.


३. इंट्रा युटेराईन इनसेमिनेशन : कृत्रिम पद्धतीने शुक्राणूंचा स्त्रीच्या गर्भात प्रवेश घडवून आणला जातो.


४. एम्ब्रयो ट्रान्स्फर : प्रयोगशाळेत वाढवलेला गर्भ पुढील वाढीसाठी स्त्रीच्या गर्भाशयात ठेवला जातो.


कृत्रिम गर्भधारणा प्रक्रियेत सहभागी असलेल्या पुरुषाकडून कृत्रिम गर्भधारणेसाठी आवश्यक अशा प्रकारचे शुक्राणू मिळवण्यासाठी काही वैद्यकीय पद्धतींचा अवलंब करता येतो. 'पीएसए' (प्रिक्यूटॅनीअस एपिडायडीमल स्पर्म ऍस्पिरेशन ) आणि 'टीएसए' (टेस्टिक्युलर एपिडायडीमल स्पर्म ऍस्पिरेशन ) या त्या पद्धती आहेत.


'इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन' ही देखील कृत्रिम गर्भधारणेतील एक महत्वाची पद्धत ठरते. या पद्धतीत स्त्रीबीजात इंजेक्शनद्वारे एक शुक्राणू सोडला जातो. यात उपलब्ध शुक्राणू पुरेसे कार्यक्षम नसतील किंवा त्यांची संख्या अपेक्षित नसेल तरीही त्यांच्या साहाय्याने गर्भधारणा घडवून आणणे शक्य होते. प्रयोगशाळेत गर्भ तयार केल्यानंतर तो मातेच्या गर्भाशयात ठेवण्यापूर्वी अनुवांशिक आजारांचे निदान करण्यासाठी या गर्भाची बायोप्सी द्वारे तपासणी केली जाते.


आपल्या बाळाच्या जन्मासाठी कृत्रिम गर्भधारणा प्रक्रियेचा अवलंब करणाऱ्या जोडप्यांची या प्रक्रियेविषयी आणि तिच्या परिणामांविषयी डॉक्टरांशी मोकळेपणाने चर्चा करणे आवश्यक आहे. यात समाविष्ट असणाऱ्या प्रक्रिया समजण्यास काहीशा अवघड आहेत खऱ्या, पण संकोच न बाळगता वेळीच आपले अज्ञान डॉक्टरांकडून दूर करून घेणेही तितकेच महत्वाचे आहे. या प्रक्रियेसाठी आलेल्या प्रत्येक जोडप्याला एकसारखेच उपचार सुचवले जातील असेही नाही. प्रत्येक जोडप्याच्या वैद्यकीय गरजेनुसार त्यांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीही वेगळ्या असतात.


कृत्रिम गर्भधारणा तज्ज्ञ म्हणजे कोणी जादूगार नसतात हे लक्षात ठेवावे. वंध्यत्वाने ग्रासलेल्या जोडप्यांना गर्भधारणेसाठी मदत करणारी ही वैद्यकीय पद्धत आहे. अनेक जोडप्यांना आपले स्वतःचेच बाळ हवे असते. अशासाठी ही प्रक्रिया वरदान ठरू शकेल.

Recent Posts

See All

Comments


bottom of page